Wednesday, 25 January 2023

गणेश जयंती.


  माघी श्री गणेश जयंती का साजरी करतात ?   

                                    माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते. आता जयंती म्हणजे जन्म हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण आजही अनेकांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आणि गणेश जयंती यामधील फरक पटकन कळत नाही. म्हणूनच आज आपण माघी गणेश जयंतीबद्दल सगळी काही माहिती घेणार आहोत. माघी गणेश जयंती नेमकी कशी साजरी केली जाते. त्यामागील आख्यायिका कोणती हे आपण आता जाणून घेऊया.

माघी गणेश जयंतीविषयी तुम्हाला हे माहीत आहे का?

माघी गणेश जयंती:-

                           आपल्या लाडक्या बाप्पाचे तीन अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पाचा जन्म झाला. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंतीचा दिवस. असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. याबद्दल आणखी एक सांगितले जाते ते असे की, गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीनवेळा वेगवेगळे अवतार घेतले ते हे तीन अवतार असे देखील मानले जाते. यातील तिसऱ्या आणि माघ महिन्यातील अवताराविषयी असे सांगितले जाते. स्कंद पुराणातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. असे म्हणतात या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्याच्या वधासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला म्हणून हा जन्म माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. 

बाप्पाच्या जन्माची आख्यायिका-:

गणपती बाप्पाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. त्यापैकी एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती म्हणजे पार्वतीदेवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली. गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला. त्याचे पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले. पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळेच त्याला द्वैमातुर असे देखील म्हटले जाते. या शिवाय बाप्पाचा जन्म माघी शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला. दोन वेगवेगळ्या तिथींना बाप्पांचा जन्म झाला. हा जन्म दिवस साजरा करणे म्हणजे माघी गणेशोत्सव किंवा माघी गणेश जयंती साजरी करणे होय. या व्यतिरिक्त बाप्पाच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या आख्यायिका आजही प्रचलित आहे.

तीळाचा दिला जातो प्रसाद

बाप्पाला दाखवला जातो तिळाचा नैवेद्य-:

                     गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद दिला जातो. त्याला मोदकाचा नैवेद्य आवडतो हे आपण जाणतोच. पण माघी गणपतीच्या काळात बाप्पाला तीळाचे लाडू किंवा तीळ-साखर असा प्रसाद दिला जातो. कारण माघी जयंतीला ‘तीलकुंद चतुर्थी’ असे देखील म्हटले जाते म्हणूनच बाप्पाला तीळाचा नैवेद्य दिला जातो. 

अशी करा पूजा-:

                     पूर्वी घरच्या घरी माघी गणेश जयंती साजरी केली जातं. पण आता याला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले आहे. हल्ली अनेक ठिकाणी मंडपांमध्ये गणेशमूर्ती आणल्या जातात. पण घरी केलेल्या गणेश मूर्तीचीही तुम्ही प्रतिष्ठापना करु शकता.( पण याचा पुराणात उल्लेख नाही) जर तुम्ही मूर्ती आणू शकत नसाल तरी देखील तुम्ही गणेश जयंती करु शकता. या दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही प्रहरी गणपतीचे स्मरण करु शकता. अथर्वशीर्षाचे पठण करुन बाप्पाला दुर्वा वाहून तुम्ही ही पूजा मनोभावे करु शकता. 


आता तुम्हाला माघी गणेश जयंती का साजरी केली जाते हे नक्कीच कळलं असेल.

No comments:

Post a Comment

भारतीय शेतकऱ्यांच्या या मंदीला जबाबदार कोण?

 भारतीय शेतकऱ्यांच्या या मंदीला जबाबदार कोण?                   शेतकरी संपूर्ण देशाच्या लोकसंख्येला अन्न पुरवतात. ते फक्त जे उरले आहे तेच खात...